- गौरव प्रकाशन वृत्तसंकलन
अमरावती (प्रतिनिधी) : महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागामध्ये आज दिनांक २५ ऑगस्ट,२०२२ रोजी नवीन अग्निशमन वाहनाचे उदघाटन महानगरपालिका आयुक्त डॉ.प्रविण आष्टीकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपायुक्त (प्रशासन) भाग्यश्री बोरेकर, अग्निशमन अधिक्षक सय्यद अनवर, जनसंपर्क अधिकारी भुषण पुसतकर, उपअभियंता प्रमोद कुलकर्णी, सहाय्यक अभियंता राजेश आगरकर, कनिष्ठ अभियंता अमित गुरमाळे, अग्निशमन विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.
महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाकडे अत्याधुनिक वाहन दाखल झाले आहे. शीघ्र गतीने आग विझविण्यासाठी आवश्यक त्या सर्व सुविधा या वाहनावर आहे. या वाहनाद्वारे आपत्ती व्यवस्थापन विभागाची ताकद वाढली असून, वाहनाचा वेग आणि त्याची क्षमता पाहता वेळीच घटनास्थळी पोचणे शक्य होणार आहे. परिणामी, आगीपासून होणारे नुकसान कमी करण्यास मदत होईल.
नवे साडेचार हजार लिटर क्षमतेचे असून, त्यातील ५०० लिटरचे फोम टॅंक आहे. अत्याधुनिक सुविधेमुळे आपत्ती व्यवस्थापन जलदगतीने करण्यासाठी पथकाची ताकद वाढली. आयुक्त डॉ.प्रविण आष्टीकर यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे नवे वाहन दाखल झाले.
यावेळी महानगरपालिका आयुक्त डॉ.प्रविण आष्टीकर म्हणाले की, अमरावती फायर ब्रिगेड ही शहरातील सर्वात मोठी अग्निशमन यंत्रणा आहे. शहराच्या अग्निशमन दलाकडे जगातील अद्ययावत साधन आहेत. यामध्ये प्रगत अग्निशमन यंत्रणा आणि प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध आहेत. अग्निशमन दलाच्या जवानांनी त्यांच्या जीवावर खेळून कित्येकांचे प्राण वाचवले आहेत. अग्निशमन दलाचे आधुनिकीकरण करण्यास आम्ही सदैव तत्पर आहोत.