अमरावती : अमरावती परिमंडलात वीज चोरीच्या वाढत्या सुळसुळाटाला आवर घालण्यासाठी महावितरणने आता एक्शन मोड घेतले असून गेल्या तीन दिवसात अमरावती व यवतमाळ जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी धाडी मारून २२५ वीज चोरीच्या घटना उघड करण्यात आल्या आहे. परिमंडालातील थकबाकी वसूलीचे आवाहन समोर असतांना परिमंडलाअंतर्गत अमरावती व यवतमाळ जिल्ह्यात वीज चोरीचा वाढलेला सुळसुळाट महावितरणसाठी मोठे आव्हान ठरत आहे. त्यामुळे महावितरणने दिनांक २३,२४ व २५ या तीन दिवसात वीज चोराविरूध्द एक्शन मोड घेत वेगवेगळ्या ठिकाणी नियोजनबध्द मारलेल्या धाडीत २२५ वीज चोरांवर कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये थेट वीज चोरी किंवा मीटरमध्ये फेरफार करून वीज चोरी करणार्यांची संख्या ही १९१ आहे, तर ३४ ग्राहकांनी ज्या कामासाठी विजेची मागणी केली होती त्यासाठी न वापरता स्वताच्या फायद्यासाठी वापरत महावितरणची फसवणूक केली आहे. एकून १ लक्ष २८ हजार ८६0 युनिट आणि १३ लक्ष ७२ हजार रूपयाच्या या वीजचोरीत जर ग्राहकांनी दंडासहित रक्कम भरली नाही तर संबंधितावर विद्युत कायदा कलम १३५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.आधिच थकबाकी वसूल न झाल्याने महावितरण आर्थीक अडचणीतून जात असतांना वीज चोरांने घातलेला धूमाकुळ महावितरणचे कंबरडे मोडणारा आहे.त्यामुळे यापुढे महावितरण अमरावती परिमंडलाअंतर्गत नियमित मोहिमा राबवीत वीज चोरांवर कठोर कारवाईसाठी प्रयत्न करण्याचे निर्देश क्षेत्रीय कार्यालयांना देण्यात आले आहे.
(Image Credit : Lokmat)