- * ४१ वी आमसभा उत्साहात संपन्न
- * श्री सुभाष भावे – उपाध्यक्ष; डॉ. शशांक देशमुख – कोषाध्यक्ष; डॉ. गणेश हेडावु – सहसचिव
- गौरव प्रकाशन वृत्तसंकलन
अमरावती (प्रतिनिधी) : नुकतीच अमरावती गार्डन क्लबची ४१ वी आमसभा श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालयाच्या दृकश्राव्य सभागृहात संपन्न झाली. सर्वप्रथम दिवंगत सभासदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली व आमसभेचे पुढील कामकाज सुरु झाले. मा. अध्यक्ष डॉ. दिनेश खेडकर यांनी विषयपत्रीकेनुसार सर्वप्रथम ४० व्या आमसभेचे इतिवृत्त क्लबच्या सचिव डॉ. रेखा मग्गीरवार यांनी सादर केले व त्यास सभागृहाने मान्यता दिली. विद्यमान कार्यकारिणीद्वारा मागील तीन वर्षात राबविलेल्या उपक्रमांचा आढावा दर्शविणारा अहवाल व्हिडियो दाखविण्यात आला. कोषाध्यक्ष डॉ. शशांक देशमुख यांनी जमाखर्चाचे विवरण तसेच अंदाजपत्रक सभेसमोर मांडले. विस्तृत चर्चेनंतर सभागृहाने लेखा अहवालास कार्योत्तर मंजूरी दिली.
सर्व उपस्थित सन्माननीय सभासदांनी गतवर्षामध्ये या कार्यकारिणीने राबविलेल्या उपक्रमांचे भरभरून कौतुक केले. बेसिक गार्डनिंग टेक्निक, रोपदान: सामाजिक दायित्व उपक्रम, शेवंतीची लागवड व मशागत कार्यशाळा, वाईल्ड ग्लोरी – ऑनलाइन राष्ट्रीय प्रदर्शनी स्पर्धा, बोन्साय निर्मिती कार्यशाळा, मायक्रोग्रीन्स कार्यशाळा. अलकाताई गभणे पुरस्कृत सिझनल प्लांट्स – लागवड व संवर्धन कार्यशाळा, एनव्हायर्नमेंटल व्हॉलंटीयरिंग – वार्षिक इंटर्नशिप प्रोग्राम, वृक्ष पालकत्व अभियान, ग्रीन कोर्स असे अनेक उपक्रम राबविण्याचा जणू काही विक्रमच केला. या सर्व आयोजनांच्या माध्यमातून अमरावती गार्डन क्लबचे विदर्भस्तरीय कार्य आता राज्य आणि देश-विदेश पातळीवर पोहचले असून, यानिमित्ताने शहर परिसरातील नागरिकांनी फुलविलेल्या मनमोहक सृष्टिचा आनंद या सर्वांसाठीच आकर्षण ठरत असल्याचे गौरवोद्गार यावेळी सभासदांनी काढले. विद्यमान अध्यक्षांनी सभागृहाचे आभार मानून आमसभेसमोरील महत्वाचा विषय असलेल्या निवडणुकीची घोषणा केली.
वर्ष २०२२-२३ करिता कार्यकारिणीची निवडणूक पार पाडण्यासाठी सभागृहाने जेष्ठ सभासद प्रा. चंद्रशेखर देशमुख यांनी निवडणुक अधिकारी म्हणून निवड केली. त्यांनी निवडणुकीची मार्गदर्शक तत्वे घोषित करून निवडणूक जाहीर केली. सभागृहात उपस्थित माजी अध्यक्ष डॉ किशोर बोबडे यांनी विद्यमान अध्यक्ष डॉ दिनेश खेडकर यांच्या अध्यक्षतेतील कार्यकारिणीचे प्रभावी कार्य सुरु असल्यामुळे त्यांची अध्यक्षपदी फेरनिवड करण्यात यावी अशी विनंती सभागृहासमोर व्यक्त केली. तसा प्रस्ताव श्री संतोष गुप्ता यांनी सादर केला व माजी प्राचार्य श्रीमती उर्मी शाह यांनी त्यास अनुमोदन दिले. या प्रस्तावानुसार, डॉ. दिनेश खेडकर, प्राध्यापक वनस्पतिशास्त्र विभाग, श्री. शिवाजी विज्ञान महाविद्यालय, अमरावती यांच्याकडे पुनश्च अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली. पुढील प्रक्रियेमध्ये उपाध्यक्षपदी श्री सुभाष भावे, संचालक किरण नर्सरी; कोषाध्यक्षपदी डॉ. शशांक देशमुख, प्राचार्य, श्री शिवाजी उद्यानविद्या महाविद्यालय, सचिवपदी डॉ. रेखा मग्गीरवार आणि सहसचिव म्हणून डॉ. गणेश हेडावू यांची एकमताने निवड करण्यात आली. कार्यकारिणीचे सदस्य म्हणून श्री अनिल भोंडे, डॉ उमेश कनेरकर, डॉ गजेंद्र पचलोरे, श्री मयूर गावंडे, श्री अशोक हांडे आणि श्री पांडुरंग सालबर्डे यांची निवड झाली.निवडणुकपश्चात नवनिर्वाचित अध्यक्षांचे सभागृहात अभिनंदन केले. डॉ. गजेंद्र पचलोरे यांनी आभारप्रदर्शन करून आमसभेचे समापन केले.
- ——–
गार्डन क्लब नेहमीच निसर्गाचे सानिध्य व आपली संस्कृती जपण्यास प्राधान्य देत असते, आपल्या कार्यामध्ये कुठेही व्यावसायिकता येऊ नये याची दक्षता क्लबचे सन्माननीय सदस्य घेत असतात. त्यामुळे सामाजिक कार्यामध्ये झोकून देणारे सभासद हि क्लबची जमेची बाजु आहे व त्यांच्या सहकार्यानेच भविष्यात क्लबची दिमाखदार वाटचाल सुरु आहे. विद्यार्थ्यानी निसर्गाच्या सान्निध्यात येवून त्याचे संवर्धन करावे यावर येणाऱ्या काळात भर दिला जाईल.
- – डॉ दिनेश खेडकर, अध्यक्ष
- ——–
- ———-
अमरावती गार्डन क्लब द्वारा आगामी वर्षात विविध उपक्रम राबविण्यासाठी नियोजन करण्यात येणार आहे. मोबाईलच्या विळख्यात जखडलेल्या विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यासाठी विद्यार्थीभिमुख उपक्रम राबविण्यात येतील. नव्या शैक्षणिक धोरणांतर्गत अत्यावश्यक कौशल्यविकास साधणारे अभ्यासक्रम आणि विद्यापीठातून आपल्या शैक्षणिक पात्रता वाढविणाऱ्या इंटर्नशिपच्या संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्याचे क्लबचे उद्दिष्ट्य आहे.
- -डॉ रेखा मग्गीरवार, सचिव