अमरावती : जिल्हयात कोरोना संक्रमणाचा वाढता धोका लक्षात घेता प्रशासनाकडून २२ फेब्रुवारी ते १ मार्चपर्यत पुन्हा लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, या निर्णयामध्ये प्रशासनाने जीवनावश्यक वस्तू वगळता इतर सर्व सेवा बंद राहण्याचे स्पष्ट केले असताना देखिल अमरावतीकरांनी वस्तू खरेदी करण्यासाठी बाजारपेठा मध्ये प्रचंड गर्दी केली होती. विशेष म्हणजे या गर्दीमध्ये असंख्य नागरिक हे मास्क न लावताच वावरत असल्याचे धक्कादायक चित्र दिसून आले. सोशल डिस्टन्सिंगचा तर पूर्णपणे फज्जाच उडाल्याचे दिसून आल्यामुळे कोरोनाचा धोका अधिकच बळावला आहे.
सातत्याने वाढत असलेल्या कोरोना रुग्णामुळे प्रशासनासमोर पुन्हा नवीन आवाहन निर्माण झाले आहे. जिल्ह्य़ात सातत्याने वाढत असलेल्या रुग्णांवर अंकुश लावण्यासाठी जिल्हा प्रशासनाने दर शनिवारी रात्री ८ वाजतापासून सोमवारी सकाळी ८ वाजेपर्यत कडक निबर्ंधासह लॉकडाऊनचे आदेश दिले आहे. ३६ तासांच्या या लॉकडाऊननंतर जिल्ह्य़ात पुन्हा ८ दिवसासाठी संचारबदी लावण्यात येणार असल्याचे प्रशासनाने जाहीर करताच नागरिकांनी बाजारपेठामध्ये जीवनावश्यक वस्तुसह इतरही वस्तूंच्या खरेदीसाठी प्रचंड गर्दी केली होती. भाजी बाजार, जवाहर रोड, कपडा मार्केट यासह चौका चौकात विक्रीसाठी बसलेले भाजीवाले यांच्याकडे मोठया प्रमाणात गर्दी दिसून आली. विशेष म्हणजे प्रशासनाने आखून दिलेल्या नियमामध्ये जीवनाश्यक वस्तूंची विक्री नियमित सुरू राहील. ज्यामध्ये भाजी बाजार ठोक विक्रेत्यासाठी सकाळी ३ ते ६ वाजेपर्यत भाजी विक्री सुरू ठेवण्यात आली असून गल्ली बोळात भाजीवाले सकाळी ८ ते दुपारी ३ वाजेपर्यत भाजीपाला विकू शकतील, असे नमूद असतांना देखील नागरिकांनी खरेदीसाठी मोठया प्रमाणात गर्दी केल्याचे दिसून आले. प्रशासनाने केवळ गर्दी न करण्याचे आवाहन केले असतांना प्रशासनाच्या आदेशाची नागरिकांकडून पायमल्ली होताना दिसून आली. विशेष म्हणजे मास्क लावणे, सोशल डिस्टन्सिंग या नियमांची तर राखरांगोळीच अमरावतीकरांनी केल्याचे दिसून आले आहे. अशा भयावह परीस्थितीत कोरोनाचा धोका अधिक वाढला असून, अशीच परीस्थिती राहिल्याचे जिल्हयासह राज्यात पुन्हा संपूर्ण लॉकडाऊनची वेळ येणार हे मात्र नक्की!