अमरावती : गरीब, वंचित तसेच गरजू ग्रामीण नागरिकांना सहजसाध्य, परवडण्याजोगी, कार्यक्षम, उत्तरदायी आणि विश्वासार्ह आरोग्य सेवा उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानात अनेक कार्यक्रम राबविले जातात. तथापि, जिल्हा यंत्रणेकडून त्यांची चांगली अंमलबजावणी होत नसल्याचे निदर्शनास आले आहे. अभियानातील अनेक कामांबाबत मोठ्या प्रमाणावर तक्रारी आहेत. या सर्व बाबींची त्रयस्थ यंत्रणेकडून चौकशी व्हावी व जबाबदारांवर कारवाई व्हावी, असे निर्देश राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी आज येथे दिले.अभियानातील विविध कामांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत त्या बोलत होत्या. आमदार बळवंतराव वानखडे, माजी आमदार वीरेंद्र जगताप, जि. प. आरोग्य सभापती बाळासाहेब हिंगणीकर, जयंतराव देशमुख, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप रणमले, डॉ. रेवती साबळे आदी उपस्थित होते.पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, संसर्गजन्य व असंसर्गजन्य, स्थानिक रोगांच्या साथीचा प्रतिकार व नियंत्रण, एकात्मिक प्राथमिक आरोग्य सुविधांचा वापर वाढविणे,आरोग्यदायी जीवनाचा प्रचार व प्रसार, प्राथमिक आरोग्य केंद्र व सामाजिक आरोग्य केंद्राचे सक्षमीकरण, आरोग्य सेवांचा वापर वाढविणे, उपकेंद्राला स्थानिक नियोजन करण्यासाठी सक्षम करणे आणि बहुउद्देशीय कार्यकर्त्यांची उपलब्धता वाढविणे अशी कितीतरी कामे करण्यासाठी मोठा निधी या अभियानात उपलब्ध करून दिला जातो. मात्र, त्या प्रमाणात सुविधांची वाढ झाल्याचे दिसत नाही. अनेक कामे अपूर्ण आहेत. अनेक कामे निकृष्ट दजार्ची असल्याबाबत ग्रामीण भागातून तक्रारी प्राप्त आहेत. या सर्व बाबींची चौकशी त्रयस्थ यंत्रणेकडून व्हावी व जबाबदारांवर कठोर कारवाई करावी, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.
Related Stories
September 17, 2024
September 14, 2024