गोडधोडाने सुस्तावलेले, गाढ झोपले होते घरात।।
मध्यरात्री अनेकांचे मोबाईल खणाणले।
चमत्कारिक बातमीने धाबे त्यांचे दणाणले ।।
भितीदायक संदेश फोनवर आला।
अफवांचा बाजार गरमागरम झाला।।
कुठे देवी रडत होती
डोळ्यातुन रक्त आले ।
कुठे मुर्ती खोल गेली,
तोंड तिचे काळे झाले।।
कुठे व्हायरस पसरला
लोक अकडून गेले।
कुठे धरणीकंप झाला
काही झोपेतच मेले।।
चमत्कार एकमेकांना सांगत सारे सुटले।
चोहीकडे अफवांचे पेवच पेव फुटले।।
प्रत्येक आपल्या अकलेचे तारे होते तोडत।
अफवांच्या वाकळीला ठिगळ होते जोडत।।
हितचिंतक सांगत होते कोप देवीचा होणार आहे।
जागणारेच वाचणार आणि झोपेल ते मरणार आहे।।
मरणाच्या भितीनं भयभीत झाले।
जत्थेच्या जत्थे घराबाहेर आले।।
चिमुरड्यानांही जागण्यास भाग त्यानी पाडले।
जीवाच्या आंकातानं घराबाहेर काढले।।
मंदिरात सुरू झाले होमहवन -पुजन।
कुठे प्रार्थना, आरत्या तर कुठे रात्र भजन।।
‘जागते रहो’चे नारे चोहीकडे गाजले।
लहानथोर बायाबापडे सारी रात जागले।।
साथीच्या मानसिक रोगात सारे अडकुन फसले।
एकच एक विषय चघळत बसले।।
बिनधास्त झोपले तेच खरे जागे होते।
रात्रभर जागणारे कैक पिढ्या मागे होते।।
अंधश्रद्धाळूंचे झाले भयानक हाल।
मोबाईल कंपन्या झाल्या मालामाल।।
चिकित्सेअभावी हा झाला सगळा ड्रामा।
दुसर्या दिवशी कळले आपला झाला होता *मामा*।।
– प्रा. रमेश वरघट
करजगाव
ता. दारव्हा जि. यवतमाळ