अपुरी झोप ही अनेक विकारांचं कारण बनते. छोट्यामोठय़ा शहरांमधल्या लोकांमध्ये झोपेचं प्रमाण कमी झाल्याचं आढळून आलंय. अपुर्या झोपेमुळे ताण वाढतो. उच्च रक्तदाब, मधुमेह, डोकेदुखीसारख्या समस्या सुरू होतात. कोणतंही काम राहलं की आपण झोपेचा त्याग करतो. रात्रभर जागून काम करतो. कळत नकळत याचा परिणाम आरोग्यावर होत असतो. त्यामुळे नव्या वर्षात पदार्पण करताना अपुर्या झोपेला मागे सोडा. नव्या वर्षात पूर्ण, व्यवस्थित झोप घ्या यामुळे तुमचं आरोग्य चांगलं राहण्यास मदत होईल. अपुर्या झोपेचे दुष्परिणाम आणि ही समस्या सोडवण्याच्या उपायांविषयी..
गेल्या काही वर्षात अपुर्या झोपेमुळे निर्माण होणारे जीवनशैलीची संबंधित विकार बरेच वाढल्याचं आकडेवारी सांगते. मिटिंगची तयारी असो, गृहपाठ असो, इंटरनेट सर्फिंग असो किंवा राहिलेलं काम असो. दिवसभराचा वेळ पुरत नसल्याने रात्रीची अत्यावश्यक झोप मारून आपण ही कामं करत बसतो. एखाद्या दिवशी तासभर कमी झोपल्याने काय होणार असाच विचार लोक करतात. पण प्रत्यक्षात दर महिन्याला एका दिवसाच्या झोपेवर यामुळे परिणाम होत असतो. पर प्रत्येक वर्षाला पंधरा दिवस आपण अपुरी झोप घेतो. यामुळे हार्मोन्सच्या कार्यात अडथळे येतात. मुख्य म्हणजे १५ ते ३५ या वयोटातली मंडळी अपुरी झोप घेत असल्याचं वास्तव समोर आलंय. तरूण वयात येणारा ह्दयविकाराच्या झटक्याचं हे कारण असू शकतं, असं तज्ज्ञ मंडळी सांगतात.
अस्वस्थतेपासून नैराश्यपर्यंत विविध विकारांमागे अपुरी झोप हे कारण असू शकतं. मधुमेह, ह्दयविकार जडण्यामागे अपुरी झोप असू शकते, हे आपण लक्षात घेत नाही. बीपीओ, कॉलसेंटर्समध्ये काम करणार्या कर्मचार्यांना जीवनशैलीशी संबंधित विकार जडण्याचा धोका सर्वाधिक असतो.
दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे वेळेत झोपणंही तितकंच महत्त्वाचं आहे. लवकर झोपून लवकर उठलं पाहिजे. पहाटे झोपून आठ तास झोप घेण्याला काहीच अर्थ नाही. झोपण्याआधी मोबाईल, टॅबसारख्या गॅझेट्सचा वापर करू नका. झोपण्याच्या तासभर आधी टव्ही बंद करा. अपुर्या झोपेच्या समस्येकडे दुर्लक्ष करू नका. डॉक्टरांचा सल्ला घ्या. अपुर्या झोपेमुळे त्वचेवर सुरकुत्या पडू शकतात. डोळ्यांखाली काळी वतरुळं येऊ लागतात. आपण वेळेआधीच म्हातारे दिसू लागतो. केस गळण्यासारख्या समस्या निर्माण होतात. मोबाईलच्या प्रकाशामुळे झोपेवर परिणाम होतो. त्यामुळे झोपण्याआधी मोबाईल बाजूला ठेवा. पलंगावर झोपून व्हॉट्स अँपचा वापर करू नका.
झोपेची गरज व्यक्तीसापेक्षा बदलत जाते. पण २६ ते ६४ या वयोगटातल्या लोकांना ७ ते ९ तासांची झोप आवश्यक असते असं नॅशनल स्लीप फाउंडेशनचं सर्वेक्षण सांगतं. अपुरी झोप हे वजन वाढण्याचं कारण ठरू शकतं. अपुर्या झोपेमुळे गोड, तळकट पदार्थ खाण्याची इच्छा निर्माण होते.
अपुरी झोप आणि अतिताण यामुळे ह्दयावर विपरित परिणाम होतो. रात्री पाच तासांपेक्षा कमी झोप घेतल्याने ह्दयविकाराचा झटका येण्याचं प्रमाण अनेक पटींनी वाढतं, असं अभ्यासातून समोर आलंय.
म्हणूनच नव्या वर्षात आरोग्यविषयक संकल्प करत असाल तर शांत झोप तुमच्या यादीत पहिल्या क्रमांकावर असू द्या. झोप झाली की तुमच्या आरोग्यविषयक समस्यांचं निवारण होण्यास मदत होईल.
Related Stories
November 20, 2023
October 27, 2023
October 12, 2023