वर्धा : देवळी तालुक्यातील बोदड (मलकापूर) येथील एकाच कुटुंबातील सख्ख्या दोन बहीण-भावांचा अन्नातून विषबाधा होऊन मृत्यू झाला. तर त्यांच्या आईलाही विषबाधा झाली असून ती सेवाग्राम येथील रुग्णालयात उपचार घेत आहे. उन्नती सिद्धार्थ कांबळे (वय १0) व सम्यक सिद्धार्थ कांबळे (वय २) अशी मृत्यू झालेल्या भावंडांची नावे आहेत. ही घटना रविवार, २0 जून रोजी घडली. या घटनेने कुटुंबीयावर दु:खाचा डोंगर कोसळला असून गावावरही शोककळा पसरली आहे.
वर्धा तालुक्यातील बोदड मलकापूर येथील कांबळे कुटुंबीयांनी एकत्रित जेवण केल्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास उन्नती सिद्धार्थ कांबळे, सम्यक सिद्धार्थ कांबळे व आरती सिद्धार्थ कांबळे यांना उलट्या, जुलाबाचा त्रास होऊ लागल्याने उपचारासाठी पुलगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान, मुलाला व आईला सेवाग्राम येथे हलविण्यात आले. मुलीची प्रकृती ठीक असल्याने तिला सुट्टी देण्यात आली होती.
सेवाग्राम येथे उपचारादरम्यान सम्यक याचा १९ जूनला मृत्यू झाला, तर उन्नतीची प्रकृती ठीक असल्याने तिला ग्रामीण रुग्णालय पुलगाव येथून सुट्टी देण्यात आली. दुसर्या दिवशी २0 जून रोजी अचानक उन्नतीची प्रकृती बिघडल्यामुळे तिला सेवाग्राम येथे भरती करण्यात आले. उपचारादरम्यान उन्नतीचा मृत्यू झाला. शुक्रवारी जेवताना जांभूळ खाल्ले होते. तसेच मटन खाल्ल्यानंतर दूध पिल्याची माहितीही पुढे येत आहे. मात्र, या बहीण- भावाचा मृत्यू नेमका कसा झाला, यासाठी त्याची उत्तरीय तपासणी करून व्हिसेरा पुणे प्रयोगशाळेला पाठवण्यात आले आहेत. आरती सिद्धार्थ कांबळे (वय ३२) यांच्यावर सेवाग्राम येथील रुग्णालयात उपचार सुरू आहे. दोन्ही भावंडासह त्यांची आई व वडील सिद्धार्थ कांबळे यांनीही परिवारासह जेवण केले होते. मात्र, वडिलांना कोणतीही विषबाधा झाली नसल्याचे म्हटले आहे. नेमकी विषबाधा झाली कशी, याचा शोध पोलिस घेत आहेत.
Related Stories
September 8, 2024
September 5, 2024
September 5, 2024