अमरावती :भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर विशेष अनुदान योजनेतंर्गत अनुसूचित जातीतील इयत्ता दहावीमध्ये 90 पेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांना विशेष अर्थसहाय्य देण्यात येत आहे. या विद्यार्थ्यांना MS-CIT, NEET, JEE इत्यादी व्यावसायिक उच्चशिक्षणाची पूर्वतयारी करता यावी, यासाठी ही योजना असून मार्च 2021 मध्ये दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना ही लागू आहे.
यासाठी विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी असावे. तसेच कुटुंबातील कोणताही सदस्य शासकीय अथवा निमशासकीय सेवेत कार्यरत नसावा. यासाठी पालकांनी स्वघोषणापत्र देणे गरजेचे आहे. सोबतच विद्यार्थी / वडील यांचे जातीचे प्रमाणपत्र, उत्पन्नाचे प्रमाणपत्र, इयत्ता दहावीची गुणपत्रिका, रहिवासी दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, मुख्याध्यापकांचे शिफारस पत्र इत्यादी कागदपत्रांची साक्षांकित प्रतीसह अर्ज डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे या पत्त्यावर रजिस्टर पोस्टाने पाठवावा, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त माया केदार यांनी पत्रकाद्वारे केले आहे. अर्जाच्या अनुषंगाने अटी, शर्ती व कार्यपद्धती तसेच अर्जाचा नमुना याबाबत अधिक माहितीसाठी बार्टीचे संकेतस्थळ http://barti.in/notice-board.php यावर भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.