- * विशेष अतिसार नियंत्रण पंधरवड्याचा शुभारंभ
- गौरव प्रकाशन वृत्तसंकलन
अमरावती (प्रतिनिधी) : जिल्ह्यात 1 ते 15 जुलैदरम्यान विशेष अतिसार नियंत्रण पंधरवड्यानिमित्त विविध कार्यक्रम आयोजिण्यात आले असून, त्याचा शुभारंभ जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रमोद निरवणे यांच्या उपस्थितीत जिल्हा रूग्णालयात झाला. अतिसारामुळे होणारे बालमृत्यू शून्यावर आणण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, घरोघर बालकांना झिंक व ओआरएसचे वाटप करण्यात येणार आहे, असे डॉ. निरवणे यांनी यावेळी सांगितले. प्र. अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नरेंद्र सोळंके, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत घोडाम, नेत्र तज्ज्ञ डॉ. कांचन जवंजाळ, अधिसेविका ललिता अटाळकर, आहार तज्ज्ञ कविता देशमुख यांच्यासह अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
अतिसार किंवा डायरिया आजार हा पाच वर्षाखालील बालकांच्या मृत्यूचे प्रमुख कारण आहे. देशातील पाच वर्षांखालील बालकांच्या एकूण मृत्यूंपैकी सुमारे 7 टक्के मृत्यू अतिसाराने होतात. आजारांपासून बालकांचे संरक्षण व्हावे म्हणून ‘विशेष अतिसार नियंत्रण पंधरवडा’ राबविण्यात येत आहे. कोविड-19 प्रतिबंधाचे सर्व नियम पाळून व अतिसारामुळे होणारे बालमृत्यू शून्यावर ठेवण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून हा उपक्रम सर्वदूर राबवला जात आहे.
उपक्रमात अतिसार व्यवस्थापनासाठी जागरूकता निर्माण करणे, ओआरएस- झिंक कॉर्नरची स्थापना, पाच वर्षांखालील मुले असलेल्या कुटुंबांना ओआरएस, झिंकचे वाटप करणे व स्वच्छताविषयक कार्यक्रम हाती घेण्यात आले आहेत, असे डॉ. निरवणे यांनी सांगितले.सार्वजनिक आरोग्य परिचारिका कविता ढोबळे यांनी प्रास्ताविक केले. समुपदेशक उद्धव जुकरे यांनी सूत्रसंचालन केले. मनीषा वानखडे, प्रकाश वानखडे, संजू डहाळे, संतोष चावरे यांनी कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सहकार्य केले.