मुंबई :अमरावती जिल्हातील अचलपूर मतदारसंघात उद्योगांसाठी एकही एमआयडिसी नाही. यासंबधी कामगार राज्यमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चु कडू यांनी ही बाब राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या लक्षात आणून देताच त्यांनी तीन एमआयडिसीच्या उभारणीला हिरवी झेंडी दाखविली आहे. त्यानुसार तोंडगांव,भुगांव व चांदुरबाजारला एमआयडिसी उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
अचलपूर मतदार संघातील उद्योगांशी व एमआययडिसींशी संबधित विषयांवर सुभाष देसाई आणि बच्चु कडू यांच्यात बैठक झाली. अचलपूर मतदार संघातील तोंडगाव एमआयडिसीसाठी शेतकऱ्यांच्या सुपिक जमिनी घेण्यात आल्या होत्या. परंतु या जमिनींवर अद्यापही एकाही उद्योगाची उभारणी झालेली नाही. यासंबधी बच्चु कडू यांनी अमरावतीत एमआयडिसींच्या अधिकाऱ्यांसोबत एक बैठक घेत अचलपूर मतदारसंघातील तोंडगावच्या प्रश्नासह इतर एमआयडिसींचा आढावा घेतला होता. ज्या प्रमाणे जिल्हा आणि तालुका पातळीवर एमआयडिसी असतात. त्याच प्रमाणे आता 25 हजार लोकसंख्येच्या गावात ग्रामोद्योग केंद्र उभारले जाणार आहे. प्रायोगिक तत्वावर 10 ते 20 एकर जमिनीवर हे ग्रामोद्योग केंद्र असेल. याचा फायदा बचत गट,छोटे कारागीर व कामगारांना होऊन गावातच त्यांना रोजगार उपलब्ध व्हावा अशी बच्चु कडू यांची संकल्पना आहे. ग्राम विकासाला मोलाचा हातभार लावणारी श्री.कडू यांची ही स्तुत्य संकल्पना ऐकून उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी त्याला तत्वतः मान्यता दिली. तोंडगाव एमआयडीसीत सुपिक जमिनीवर उद्योगच नसल्याने त्या जमिनी परत करण्याची शेतकऱ्यांची मागणी होती. ही मागणी उद्योग मंत्री.श्री.देसाई यांनी मान्य केली. तसेच उर्वरीत जमिनीवर उद्योग उभारण्याच्या हालचालींना वेग देण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. अमरावती – परतवाडा मार्गावरील भुगाव येथे 30 हेक्टर जमिनीवर एमआयडिसी उभारली जाणार आहे. तसेच चांदुर बाजार हे तालुक्याचे ठिकाण असून ते दक्षिण – उत्तर भागाला थेट रेल्वे मार्गाने जोडले गेले आहे.त्यामुळे चांदुरबाजारला एमआयडिसीचे महत्व बच्चु कडू यांनी लक्षात आणून देताच उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी हिरवी झेंडी दाखविली.