” मी उजेडाच्या दिशेने निघालो ” हा अरुण विघ्ने सरांचा कवितासंग्रह अंधारातून उजेडाकडे नेणारा विचारप्रवाह मनाच्या पटलावर आपले अस्तित्व कोरल्याशिवाय राहत नाही . मुखपृष्ठावरचे चित्रच कवीच्या मनातील वेदनेचा व परीवर्तनाचा सूर्य प्रकाशित होत जात असल्याचा अनुभव येतो. समाजातील काळा ठिक्कर भूतकाळ, विषमतेच्या अंगाराच्या निखा-यावरुन कवी उजेडाच्या दिशेने निघाला. त्याच्या सोबत त्याच्या कविता आहेत. तो आई वडिलांना,आजी माजी कार्यकर्त्यांच्या अथक परिश्रमाला विसरत नाही. त्यांच्या संस्काराची शिदोरी बरोबर घेऊन निघालाय,बरोबर बुध्द, फुले ,कबीर, शाहू, डाॅ.बाबासाहेब, माता रमाई, माता भिमाई, सावित्री यांचे विचार घेऊन त्यांच्या प्रेरणांच्या प्रभावातूनच अरुण विघ्नेंची कविता जन्म घेते.
उद्याचा सूर्य आपल्यासाठी योजनांचे कोणते पँकेज घेऊन येणार ,याची आशा न करता रात्रीच्या गर्भात वळवळणा-या विषमतेचा चक्रव्यूह छेदीत ,नवा रस्ता करीत उजेडाच्या दिशेने निघालाय एक नविन श्वास घेण्यासाठी. म्हणून कवी म्हणतो…
“दिव्यांनीच ठेरवावं आपापलं
कुठे कुठे पेटून प्रकाशायचं !”
मनातील काजळी चकचकीत व्हायची असेल तर,सूर्याला जागं व्हावच लागेल, ज्ञानसागराला प्रत्येकांने शोधावे लागेल. भौतिक सुख नाकारलेल्या बाबासाहेबांच्या प्रज्ञासूर्याचा आदर्श अाहेच. त्यांनीच सोन्यापरी असणारा बौद्ध दिला म्हणूनच ते म्हणतात ….
“चल सखे घर बांधू क्रातीचं
तेही गयेच्या वृक्षाखाली “
लाखो खाचखळग्यातून चालतांना ,दुष्ट विचाराच्या दगडांना ठेचाळून रक्तबंबाळ झालेली पावलं बुद्धाचा अष्टांग मार्ग स्विकारणार आहेत. माणुसकीचा धाग्याने फाटलेली नाती, दुभंगलेली मने शिवू पाहणा-या कवीला भय वाटते की, कुत्सित भावनेने कुणी हा एकतेचा धागा तोडेल. म्हणून स्वतः हून प्रत्येकाने स्वतःची जबाबदारी स्विकारावी. अशी प्रांजळ कबुली देतात. विषमतेच्या भूमीत समतेचा,
विश्वशांतीचा,बंधुत्वाचा, मैत्रीचा संदेश पेरीत अरुण विघ्ने सरांना मार्गक्रमण करायचे आहे .पंचशील, दहा पारमिता ,अष्टांगिक तत्व अंगीकारीत उजेडाच्या दिशेने जायचे आहे . हे पुन्हा पुन्हा सांगून काव्य संग्रहाच्या विचाराची उंची प्रतिभा आणि प्रतिमांच्या द्वारे मांडतांना, समर्पक यमक, अनेक भाषिक कौशल्याचा वापर सहजतेने कवी करतात . कवितेच्या अनेक प्रकारांची मांडणी करण्यात व कविच्या मनातील सामाजिक तळमळ ते पोटतिडकीने मांडतात. हे मांडतांना ते कोठेच अतिशोयक्ती न करता वास्तव चित्र मांडून वाचकाला उजेड्याच्या दिशेने घेऊन जातात.
सर्वच कविता विचार करायला लावतात, कविता वाचतांना मन अस्वस्थ होते, आईवडिल ,बुध्द,बाबासाहेब, सावित्री, माता रमाई, जोतीबा यांच्या संस्काराची झलक प्रत्येक कवितेत प्रकर्षाने जाणवते.
संविधान बदलण्याची भाषा करणा-याच्या बुडाला आग लावण्याची ताकद ठेवली पाहिजे ,अशी इच्छा कवी प्रकट करतात. मानवी जीवनाचे सौंदर्य कवी मोठ्या कलात्मकतेने मांडतात.
आशय ,विषय,अनुभूती,अभिव्यक्ती, अनुभव या भक्कम पायावर कविता उभ्या आहेत. त्यातील भावमुद्रा स्पष्ट दिसते. वाचतांना जाणवते, तसेच सामाजिक भावभावनांचा आविष्कार, मानवी जीवनातला आशावाद ओसंडून वाहतोय . त्यांच्या कवितेतील प्रतिके विलक्षण असून मनाला अस्वस्थ करतात .
अरुण विघ्ने सर हे प्रतिभावंत कवी अाहेत.
म्हणूनच प्रत्येक कवितेत परिवर्तनाचा हुंकार ऐकू येतो .
या कवितासंग्रहातूल गझला उच्चकोटीच्या आहेत .
पुस्तकाची प्रस्तावना प्रा.डाँ.भूषण रामटेके यांनी सविस्तर लिहीली . पाठराखण प्रा.डाँ. प्रमोद मुनघाटे यांनी मार्मीकपणे केली आहे.
मुखपृष्ठ अरविंद शेलार यांनी तर आतील रेखाटने संजय ओरके व प्रशांत डोंगरदिवे यांची आहेत. हे पुस्तक मध्यमा प्रकाशन ,नागपूर यांनी प्रकाशीत केले आहे .
सामाजिक परिवर्तन करणा-या या कविता प्रतिभावंत कवीच्या पंक्तीला बसणाऱ्या या कवितांचा आस्वाद वाचक निश्चितच घेतील. अशाच प्रकारचे लेखन सरांच्या कडून होऊन, त्यांच्या मनातील असणा-या आदर्श समाजाची बिजे कवितेत रुजवावीत .अशी आशा व्यक्त करुन अरुण विघ्ने सरांना पुढील लेखनास हार्दिक शुभेच्छा देतो.
– मुबारक उमराणी
सांगली
मो.९७६६०८१०९७.