अमरावती : माऊली जहागीर येथील नवीन बांधकाम झालेल्या आयएसओ मानांकन प्राप्त अंगणवाडीचे पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या हस्ते आज उद्घाटन करण्यात आले. अंगणवाडी बांधकामासह स्वयंपाक गृह, शौचालय आदी सुविधांसाठी 10 लक्ष रुपयाचा निधी उपलब्ध करुन दिला जाणार आहे. यासाठी मनरेगा तसेच जिल्हा नियोजन योजनेतून निधीची तरतूद करण्यात येईल, असे राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी सांगितले.
माऊली जहागीर येथील नवनिर्मित अंगणवाडीच्या इमारतीचे उद्घाटन पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी त्या बोलत होत्या. जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास सभापती पुजाताई आमले, जि.प. सदस्य अलकाताई देशमुख, भारतीताई गेडाम, विरेंद्र लंगडे, गजानन राठोड, तिवसा पंचायत समिती सभापती संगीता तायडे, सदस्या शिल्पा महल्ले, ज्योती ठाकरे, पदाधिकारी उषाताई देशमुख, माऊली जहागीरच्या सरपंच प्रितीताई बुंदिले, उपसरपंच सादिकभाई यांच्यासह ग्रामस्थ आदी यावेळी उपस्थित होते.
श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, मागील दिड वर्षापासून अंगणवाड्या बंद होत्या. अशा परिस्थितीतही सेविकांनी बालकांना पोषण आहाराचा बालकांच्या घरपोच पुरवठा केला आहे. बालकांचे वजन व इतर निरीक्षणाचे कामही त्यांनी नियमितपणे पार पाडले आहे. कुपोषण निर्मुलनासाठी रोजच्या नोंदी रोज ठेवून त्यांनी कर्तव्य सुरळीत पूर्ण केले आहे. अंगणवाडीच्या बालकांना स्वत:चे बालक समजून त्यांनी काम केले आहे. त्यांचे हे काम खरच वाखानण्याजोगे आहे. सेविकांच्या जीव ओतून काम करण्याने महिला व बालविकास विभागाच्या योजना प्रभावीपणे राबविल्या जात आहे. अंगणवाडी सेविकांना यापुढेही मानधन वाढीसह सर्व सुविधा शासनाव्दारे पुरविण्यात येणार असल्याची ग्वाही श्रीमती ठाकूर यांनी दिली. यावेळी माऊली जहागीरच्या अंगणवाडी सेविका निलीमा मंगळे यांच्या हस्ते पालकमंत्र्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी आबाल-वृध्द, ग्रामस्थ उपस्थित होते.